सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यामध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या सोसायटी गटातील अर्जाचा समावेश आहे. दुसरीकडे खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख आणि अनिता सगरे यांचे अर्ज वैध ठरल्याने प्रमुख नेत्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरस कायम राहिली आहे.
आमदार सुरेश खाडे यांनी सोसायटी गटासह अनुसूचित जाती गटातून अर्ज दाखल केला होता. त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर हरकत घेण्यात आली होती. सुनावणीअंती दोन्ही अर्ज अवैध ठरल्याने खाडे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या मिरज सोसायटी गटातील अर्जावरही सभासदत्वाचा कालावधी आणि कागदपत्रांबाबत हरकत घेण्यात आली होती. हा अर्ज अवैध ठरला. मात्र, महिला राखीव तसेच नागरी बँका व पतसंस्था गटातील त्यांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे. मात्र सोसायटी गटातून त्यांचा पत्ता कट झाला आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर माजी आमदार विक्रमसिंह सावंत व सुजय शिंदे यांनी हरकत घेतली होती.
पडळकर यांच्या सभासदत्वासह अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र ही हरकत फेटाळण्यात आल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी हरकतदारांकडून सुरू असल्याची माहिती आहे. खासदार विशाल पाटील यांच्या १० वर्षांच्या संचालक पदाच्या कालावधीवरील हरकत आणि आमदार सत्यजित देशमुख व अनिता सगरे यांच्यावरील थकबाकीदार असण्याची हरकत घेण्यात आली होती. संबंधित हरकतींमध्ये तथ्य आढळले नसल्याने त्यांचे अर्ज वैध ठरले.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी एकूण २९५ अर्ज दाखल झाले आहेत. छाननीनंतर आता सर्वांचे लक्ष अर्ज माघारीच्या प्रक्रियेकडे लागले आहे. प्रमुख नेत्यांसह विविध गटांतील अनेक उमेदवार रिंगणात असल्याने कोणत्या गटात किती अर्ज माघारी घेतले जाणार, यानंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यांचे अर्ज ठरले अवैध...
आमदार सुरेश खाडे, पूजा विशाल पाटील, शिल्पा शिवाजी पाटील, अर्जुन नेताजी कांबळे, महादेव रामाण्णा अंकलगी, किसान गणपती जानकर, रामचंद्र सखाराम सरगर.