सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी छाननी होणार आहे. बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ३५९ अर्ज दाखल झाल्याने या छाननीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्जांची ही प्रचंड संख्या पाहता छाननीनंतर कोणाचा अर्ज वैध ठरणार आणि कोणाचा बाद होणार, या विचाराने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे. दरम्यान, संचालकपदाचा सलग दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या अर्जांबाबत काय निर्णय होणार, यावरही राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २४ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली. यंदा मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने प्रत्येक मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी होणाऱ्या छाननीत उमेदवारांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची, पात्रतेची आणि निवडणूक नियमांनुसार आवश्यक बाबींची कसून तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातील कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे बाद होतात, हे स्पष्ट होणार असून छाननीनंतर माघारीच्या प्रक्रियेला वेग येईल.
निवडणुकीपूर्वीच जिल्हा बँकेच्या सत्ता समीकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या निवडणुकीत खा. विशाल पाटील, माजी खा. संजयकाका पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. सुरेश खाडे, आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. अजितराव घोरपडे, माजी आ. विक्रमसिंह सावंत, माजी आ. सुमनताई पाटील यांसारख्या प्रमुख नेत्यांसह विद्यमान संचालक महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, चिमण डांगे, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, अमोल बाबर, देवराज पाटील, विराज नाईक आणि रणधीर नाईक आदी दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत.
विविध गटांकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असताना एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने नेत्यांचीही मोठी कसोटी लागणार आहे. छाननीत कोणाचे अर्ज कायम राहतात, यावरच पुढील राजकीय घडामोडी व रणनीती अवलंबून असणार आहे.