सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सहा जागांसाठी आज, मंगळवार, दि. ३ रोजी मिरजेत मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आठ टेबलांवर मतमोजणी होईल. सहा जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. मतदान झालेल्या सहापैकी सोसायटी गटाच्या चार जागांमध्ये मोठी रस्सीखेच आहे.
जतमध्ये आ. गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार यांची लढत लक्षवेधी ठरली. तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील, तर कवठेमहांकाळला माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील यांच्यात काट्याची टक्कर असल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
जिल्ह्यातील सहकारातील आर्थिक सत्ताकेंद्र मानल्या जाणार्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सहा जागांसाठी १ नोव्हेंबररोजी मतदान झाले. या सहा जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९३.९१ टक्के विक्रमी मतदान झाले. मिरज मार्केट यार्डातील शेतकरी भवनमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.
जत गटात आ. गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार अशी लढत झाली. ही लढत सर्वाधिक लक्षवेधी समजली जात आहे. तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील अशी लढत आहे. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील यांच्यातील लढत चर्चेत आहे. आ. जयंत पाटील व आ. रोहित पाटील हे आपल्या समर्थक कार्यकर्त्याला जिल्हा बँकेचा संचालक करण्यात यशस्वी ठरणार का, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
मिरज सोसायटी गटात गेली दहा वर्षे खासदार विशाल पाटील हे प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांनी आपले समर्थक अण्णासाहेब कोरे यांना या गटातून उमेदवारी दिली आहे. त्यांचा मोठ्या फरकाने विजय व्हावा, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे या निकालाकडेही सर्वांचे लक्ष आहे.
जिल्हा बँकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी सत्ताधारी
आघाडीतील नेत्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही जोरदार ताकद पणाला लावली होती. त्यामुळे मंगळवारच्या निकालातून केवळ सहा संचालक निवडून येणार असून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वर्चस्वाचे चित्रही स्पष्ट होईल. मतमोजणीनंतर कोणत्या गटाला मतदारांनी कौल दिला, कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा उंचावली आणि कोणाला राजकीय धक्का बसला, याचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे.