सांगली : जिल्हा बॅँकेच्या सुमारे सहा लाख खातेदारांची बॅँक खाती रि-केवायसीसाठी गोठवण्यात आली होती. यातील 65 हजार 698 खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून रि-केवायसी केली. अजूनही सुमारे 5 लाख खातेदारांनी रि-केवायसी पूर्ण न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत. या खातेदारांनी बॅँकेशी संपर्क साधून रि-केवायसी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने रि-केवायसी नसलेली सुमारे सहा लाख खाती मागील आठवड्यात गोठवली आहेत. बॅँकेने त्यापूर्वी आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व खातेदारांना रि-केवायसी करण्याचे आवाहन वारंवार केले होते. मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बँकेला खातेदारांची रि-केवायसी करत नसल्याने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. राज्यातील अन्य बँकांवर अशा प्रकाराची कारवाई आरबीआय केली आहे. यामुळे जिल्हा बॅँक प्रशासनाने तातडीने सुमारे सहा लाख खातेदारांना रि-केवायसी करावी, असे मेसेज पाठवले. तसेच यासाठी त्यांची खाती गोठवण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली. मात्र बॅँकेने आरबीआयच्या आदेशानुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खातेदारांनी रि-केवायसीसाठी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठी गर्दी होती.
खातेदारांच्या रि-केवायसीसाठी जिल्हा बॅँकेने शनिवार व रविवारी सुटी दिवशीही बॅँकेचे कामकाज सुरू ठेवले होते. तसेच नियमित दिवशी कॅश काढण्यासाठी दोन तास मुदत वाढवून तीन 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात 6 लाख खातेदारांपैकी 65 हजार 698 जणांनी रि-केवायसी केली आहे. त्यांची खाती बॅँकेने पूर्ववत सुरू केली आहे. मात्र अद्यापही 5 लाख 35 हजार खातेदारांनी रि-केवायसी न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत.
ज्या खातेदारांनी रि-केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून रि-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच यासाठी मुदत असल्याने बँकेत गर्दी न करता ज्यांना तातडीने खात्यातील पैसे काढायचे आहे किंवा अन्य बॅँकिंग व्यवहार करायचा आहे, तसेच ज्यांच्या खात्यावर शासन अनुदान, मदत जमा होणार आहे, अशा खातेदारांनी आधी रि-केवायसी पूर्ण करावी व खाती सुरू करून घ्यावीत. यानंतर अन्य खातेदारांनी आपली खाती सरू करून घ्यावीत. मात्र रि-केवायसी केल्याशिवाय गोठवलेली खाती पूर्ववत सुरू होणार नाहीत.शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी.