प्रतिप पवार pudhari photo
सांगली

sangli : नेलकरंजी सांगली जिल्हा बँक अपहारप्रकरणी एकाला अटक

Bank Fraud: आरोपीकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी ता.आटपाडी येथील शाखेत झालेल्या अपहार प्रकरणी प्रतिप गुलाब पवार (रा. करगणी) याला आटपाडी पोलिसांनी अटक केली. त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या आरोपी पवार कडून मोबाईल आणि दोन मशीन असा 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत जुलै २०२४ मध्ये ४८ लाख ८८ हजार ३७८ रूपयांच्या अपहार केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात बँकेचा कॅशिअर,ज्युनिअर सहायक आणि शिपाई अशा तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेलकरंजी येथील शाखेत सुमारे ४९ लाखाच्या अपहार प्रकरणी मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे (रा. तळेवाडी), प्रतिप गुलाब पवार (रा. करगणी) आणि दिगंबर पोपट शिंदे (रा.नेलकरंजी) या तिघांवर जुलै महिन्यात बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारूण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली होती.

बँकेतील ज्युनिअर सहायक प्रतिप पवारने प्रमुख कॅशिअर मच्छिंद्र म्हारगुडे यांच्याकडील पासवर्डचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गोलमाल केल्याची बाब निदर्शनास आली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात आल्यानंतर या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मच्छिंद्र म्हारगुडे, प्रतिप पवार आणि दिगंबर शिंदे या तिघांनी संगनमताने बँकेचा विश्वासघात करून खातेदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला. नवीन खाती काढुन नॉन ऑपरेटिव्ह खात्यांचा वापर करून त्यातील ४८ लाख ८८ हजार ३७८ रूपये अन्य खात्यांमध्ये वळते केले. आरटीजीएस करून ही रक्कम एटीएमव्दारे काढण्यात आली. रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक चलन व व्हाऊचर न करता पासवर्डचा गैरवापर करून ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

नेलकरंजी शाखेच्या तपासणीमध्ये ही बाब उजेडात आल्यानंतर याबाबतचा अहवाल बैंकेकडे देण्यात आला. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी या प्रकरणाचा तपास आटपाडी पोलीस करत होते. नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सुचनेनुसार पुन्हा तपास आटपाडी पोलीसांकडे आला. उपनिरीक्षक राजीव केंद्रे व सहकाऱ्यांनी अपहार प्रकरणातील प्रतिप पवार याला 20 डिसेंबर रोजी अटक केली आहे.

आरोपीस न्यायालयात हजर केले असता 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्याच्याकडून 12 लाख रुपयांचे दोन पेपर कप मशीन व कच्चामाल 28 हजार 500 व एक लाख 92 हजार रुपयांचा किमती मोबाईल असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT