Sangli district bank Pudhari
सांगली

Sangli District Bank: जिल्हा बँक नोकर भरतीसाठी थेट नंदुरबार, नाशिकची परीक्षा केंद्रे

अजब कारभाराने उमेदवारांमध्ये तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) जाहीर होताच उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या केंद्रांच्या यादीला फाटा देत अनेक उमेदवारांना सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या नंदुरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जालना यांसारख्या परजिल्ह्यांमधील केंद्रे देण्यात आली आहेत.

एकूण ४४४ जागांसाठी १९ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले असून, संपूर्ण भरती प्रक्रिया 'आयबीपीएस'मार्फत राबवली जात आहे. सुरुवातीला सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड येथे परीक्षा केंद्रे असणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष हॉल तिकीट मिळाल्यानंतर थेट मध्य व उत्तर महाराष्ट्रातील दूरची केंद्रे माथी मारल्याने प्रवासाचे नियोजन आणि अतिरिक्त आर्थिक भुर्दंडामुळे उमेदवार आक्रमक झाले आहेत.

अवघ्या आठ दिवसांवर परीक्षा आलेली असताना दूरची केंद्रे आल्याने ‘परीक्षा केंद्र निवडताना सोयीचा विचार झाला की केवळ उपलब्धतेचा?’ असा संतप्त सवाल परीक्षार्थी विचारत आहेत.

उमेदवारांचे हाल

या अजब नियोजनामुळे विशेषतः ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य उमेदवारांचे हाल होणार आहेत. परीक्षेसाठी १-२ दिवस आधीच घर सोडावे लागणार असल्याने प्रवास, निवास व भोजनासाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागणार आहे. त्यातच ऐनवेळचे बस व रेल्वे आरक्षण, प्रवासाचा ताण आणि महिला उमेदवारांसोबत पालकांनाही जावे लागत असल्याने कुटुंबांचे बजेट कोलमडणार आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन जवळची केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT