सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी रविवार, दि. ६ रोजी लेखी परीक्षा होणार आहे. या भरतीसाठी तब्बल ४ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले असून, एका जागेसाठी सरासरी ६० उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. नाशिक येथील 'उत्तीर्ण' कंपनीमार्फत ही ७० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची परीक्षा प्रक्रिया सध्या रखडलेली आहे. परीक्षा केंद्रे दूर आल्याने बँक संचालक मंडळाने हरकत घेत सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा पुणे येथेच केंद्रे देण्याची मागणी केली आहे. 'आयबीपीएस' कंपनीकडून यावर कोणताही निर्णय न झाल्याने ३१ ऑगस्टरोजी होणारी लिपिक पदाची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शिपाई पदाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, उमेदवारांना ओळखपत्रे (हॉल तिकीट) ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहेत. परीक्षेची वेळ, केंद्र आणि आवश्यक नियमावलीबाबत प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ही लेखी परीक्षा ७० गुणांची होणार असून मुलाखतीसाठी ३० गुण असणार आहेत.
बँकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झालेली असून प्रारूप यादी जाहीर झाली आहे आणि त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. सध्या या हरकतींवर सुनावणी सुरू असून अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात ही शिपाई पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.
लिपिक पदाच्या परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष
सांगली जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या ४४४ जागांसाठी सांगलीसह राज्यभरातून १९ हजारांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. मात्र, ही परीक्षा स्थगित झाल्याने ती आता कधी होणार, याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे.