Sangli district bank File Photo
सांगली

Sangli News : जिल्हा बँक शिपाई पदाच्या परीक्षेला ७०० वर उमेदवारांची दांडी

आता निकाल, मुलाखतींकडे लक्ष : परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

​ सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी रविवारी दि. ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ४ हजार ४८९ उमेदवारांपैकी ३ हजार ७३३ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा दिली, तर ७५६ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

ही परीक्षा सांगली शहरातील सिटी हायस्कूल, पुरोहित हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, मालू हायस्कूल व केडब्ल्यूसी महाविद्यालय तसेच आष्टा येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय अशा सहा केंद्रांवर दुपारी १२ ते १.१५ या वेळेत पार पडली. परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांची विशेष भरारी पथकेही कार्यरत होती. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार अथवा तक्रार नोंदवली गेली नसल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली आहे.

​दरम्यान, रविवारी लेखी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर आता या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती कधी होणार, याकडे परीक्षेला बसलेल्या हजारो उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. निकालाच्या उत्तरपत्रिकेची छाननी आणि पुढील मुलाखत वेळापत्रकाबाबतची अधिकृत माहिती बँक प्रशासनाकडून लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

​दुसऱ्या बाजूला, बँकेतील लिपिक भरतीचा लढा मात्र अजूनही टांगणीला लागलेला आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या हरकतीनंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार ''आयबीपीएस'' कंपनीमार्फत लिपिक भरती सुरू झाली होती. त्यासाठी सुमारे १९ हजार अर्ज आले असून ओळखपत्रेही देण्यात आली. मात्र, कंपनीने परीक्षा केंद्रे अत्यंत दूरच्या अंतरावर ठेवल्याने बँकेच्या संचालक मंडळाने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. या वादामुळे लिपिक पदाची परीक्षा अद्याप झालेली नसून ती कधी होणार याबद्दल मोठी अनिश्चितता कायम आहे.

निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी लवकर जाहीर होऊन निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेमार्फत राबविण्यात येत असलेली शिपाई व लिपिक पदाची भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT