सांगली

सांगली जिल्हा बँक : आ. मानसिंगराव नाईक अध्यक्ष, जयश्री पाटील उपाध्यक्षपदी

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिराळ्यातील राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्षपदी काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भाजपच्या चार संचालकांनीही पाठिंबा दिला.
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न काही नेत्यांच्या विरोधामुळे फसले. परिणामी महाआघाडीचे सहकार विकास व भाजपचे शेतकरी विकास या दोन पॅनेलमध्ये जोरदार सामना रंगला. यात अनेक धक्कादायक निकाल लागले. जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, कुंडलचे राष्ट्रवादीचे नेते किरण लाड यांचा पराभव झाला.

निवडणुकीत महाआघाडीचे 17 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची अधिसूचना निघाल्यानंतर इच्छुकांनी राजकीय हालचाली गतीमान केल्या. निवडणुकीसाठी आघाडी करताना काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. मात्र सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचे निवडून आले. त्यामुळे अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा सांगितला. त्यानुसार अध्यक्ष पदासाठी आ. मानसिंगराव नाईक, विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी आ. नाईक यांना संधी देण्याचे ठरविले.

उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड हे प्रमुख दावेदार होते. शिवसेनाही उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती. आ. अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे तसेच आटपाडीचे तानाजी पाटील यांचीही नावे चर्चेत होती.
दोन्ही पदाच्या निवडीबाबत रविवारी रात्री पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे निश्चित करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता सर्व संचालकांची बैठक घेतली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव मावळते अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी सुचविले. त्यास आमदार अनिल बाबर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील यांचे नाव भाजप नेते व मावळते उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सुचविले. यास काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी अनुमोदन दिले. या वेळी संचालक आ. मोहनराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, विशाल पाटील, बी. एस. पाटील, महेंद्र लाड, अनिता सगरे, बाळासाहेब होनमोरे, अ‍ॅड. चिमण डांगे, वैभव शिंदे, सुरेश पाटील, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, सत्यजीत देशमुख, राहुल महाडिक हे उपस्थित होते. बहुमत असल्याने करे यांनी दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. त्यानंतर दोन्ही पदाधिकार्‍यांनी अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारला.

SCROLL FOR NEXT