सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून गुरुवार, दि. २२ रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. चिन्ह मिळताच सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. मात्र, बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पंधरा जागांवर प्रत्येकी एकच वैध अर्ज राहिल्याने त्या जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. आता उर्वरित ६ जागांसाठी १४ उमेदवार आमनेसामने आहेत. उर्वरित जागांपैकी तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या विकास सेवा सोसायटी गटांमध्ये अत्यंत चुरशीची लढत रंगणार आहे. चिन्ह वाटप होताच उमेदवारांनी थेट प्रचाराला वेग दिला आहे.
दुसरीकडे, अत्यंत अटीतटीच्या ठरणाऱ्या या लढतीत एक-एक मत अत्यंत निर्णायक ठरणार असल्याने मतदारांना आपल्या बाजूने राखण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. विरोधी गटाकडून होणारी मतदारांची पळवापळव रोखण्यासाठी काही उमेदवारांनी मतदारांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, तर काही ठिकाणी मतदारांना सहली व पर्यटनासाठी पाठवण्यात आल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगू लागली आहे.