तासगाव : माजी खासदार संजय पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत निवडून येताच कार्यकर्त्यांसोबत विजयोत्सव साजरा केला 
सांगली

Sangli District Bank elections | गोपीचंद पडळकरांनी गणित जुळवले

गोपीचंद पडळकरांनी गणित जुळवले

पुढारी वृत्तसेवा

जत - वसंत सावंत

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली. एकूण ८८ मतदानापैकी पडळकर यांना ५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. पडळकर यांनी २० मतांच्या फरकाने विजय संपादन केला. एकूण मतदानापैकी ६१.३६ टक्के मते मिळवत त्यांनी राजकीय वर्चस्व सिद्ध केले. पवार यांना ३८.६४ टक्के मते मिळाली. या निकालातून जत तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय ताकद आणि संघटनात्मक बांधणीचे चित्र स्पष्ट झाले.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयामागे त्यांची राजकीय ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि मतांचे प्रभावी नियोजन या बाबी महत्त्वाच्या ठरल्या. विद्यमान आमदार असल्याने त्यांना राजकीय वजनाचा फायदा झाला. सहकारी संस्थांमधील मतदारांपर्यंत पोहोचणे आणि समर्थकांची मते एकत्रित ठेवण्यात त्यांना यश आले. ८८ पैकी ५४ मते मिळवणे म्हणजे मतदारांमधील स्पष्ट आघाडी. या विजयाचा अर्थ सर्वच मतदारांचा त्यांना पाठिंबा आहे, असा होत नाही. ३४ मतदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील प्रश्न, संस्थांचे कामकाज आणि सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.

विनोद पवार यांनी विद्यमान आमदारांसमोर निवडणुकीत आव्हान उभे केले. त्यांना ३४ मते मिळाली, म्हणजेच जवळपास ३९ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला. ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र, या मतांचे विजयात रूपांतर करण्यात त्यांना यश आले नाही. आमदारांच्या संघटनात्मक ताकदीला प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव, मतदारांचे एकत्रीकरण आणि मतदानाचे नियोजन यामध्ये ते थोडे कमी पडले.

आगामी राजकारणावर परिणामाची शक्यता

या निकालाने पडळकर यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ३४ मतदारांनी पवारांच्या बाजूने कौल दिल्याने सहकार क्षेत्रातील विरोधी राजकीय प्रवाहही कायम असल्याचे स्पष्ट झाले. पडळकर यांच्यासाठी हा विजय राजकीय ताकदीची पावती असला, तरी सहकारी संस्थांच्या प्रश्नांवर सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारीही वाढवणारा आहे.

राजकीय बेरजेचा घोरपडेंना फायदा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय संघर्षाचा निकाल अवघ्या चार मतांनी लागला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विविध राजकीय गटांची जुळवाजुळव करत ३७ मते मिळवली, तर आमदार रोहित पाटील यांचे समर्थक टी. व्ही. पाटील यांना ३३ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाने घोरपडे यांनी तालुक्यातील राजकीय प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले. असे असले तरी, रोहित पाटील यांचे आव्हानही तितकेच प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले. माजी खासदार संजय पाटील, जनसुराज्य शक्तीचे नेते समित कदम आणि अनिता सगरे यांची एकत्रित भूमिका घोरपडे यांच्या बाजूने गेल्याने मतांची राजकीय बेरीज निर्णायक ठरली.

सामूहिक ताकद निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही एका नेत्याच्या वैयक्तिक ताकदीवर विजय अवलंबून राहिला नाही. राजकीय संपर्क, स्थानिक पातळीवरील गटांची बांधणी आणि मतदानापर्यंत टिकवून ठेवलेली एकजूट या घटकांनी निकालाची दिशा ठरवली.

विरोधकांचे गणित चार मतांनी बिघडले

कवठेमहांकाळ महेश देसाई

समीकरणांत बाजू भक्कम करण्याचे आव्हान होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय प्रवाहातील नेत्यांना एकत्र आणले. संजय पाटील, समित कदम आणि अनिता सगरे यांची साथ या समीकरणात महत्त्वाची ठरली. विशेषतः अनिता सगरे यांच्या भूमिकेची निकालानंतर चर्चा सुरू झाली आहे. मतदारांशी संपर्क आणि गटांची जुळवाजुळव यामुळे 'सगरे पॅटर्न'चीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

दुसरीकडे रोहित पाटील यांनी टी. व्ही. पाटील यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून घोरपडे यांच्यासमोर थेट आव्हान उभे केले होते. कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रिय ठेवत त्यांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली. विरोधी गटातील काही मते आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्नही झाल्याची चर्चा होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात मतांचे गणित जुळवताना त्यांची बाजू चार मतांनी मागे पडली. त्यामुळे हा पराभव केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित नसून तालुक्यातील राजकीय ताकदीच्या नव्या मोजमापाच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

पुढे काय होणार ?

१) आगामी स्थानिक राजकारणात या निकालाचा प्रभाव किती राहतो आणि आज एकत्र आलेले राजकीय गट पुढेही एकत्र राहतात का, यावर पुढील समीकरणांची दिशा अवलंबून असेल.

२) निष्कर्षाची नको घाई

घोरपडे यांच्यासाठी ही जुळवाजुळव यशस्वी ठरली, तर रोहित पाटील यांना आपल्या रणनीतीचे नव्याने मूल्यमापन करण्याची संधी या निकालाने दिली आहे.

३) एकतर्फी वर्चस्व नव्हे

अवघ्या चार मतांचा फरक हा या लढतीची तीव्रता अधोरेखित करणारा आहे. घोरपडे यांचा विजय मोठ्या फरकाने झालेला नसल्याने त्यातून एकतर्फी राजकीय वर्चस्वाचा निष्कर्ष काढता येणार नाही.

४) कमी लेखण्याचे नाही कारण

रोहित पाटील यांची ताकद कमी लेखण्याचेही कारण नाही. मात्र, योग्यवेळी राजकीय बेरजेचे गणित जुळवणारा गट वरचढ ठरू शकतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले.

एका मताने मिळाले राजकीय बळ

सगावच्या राजकारणात ता माजी खासदार संजय पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार सुमन पाटील यांचा केवळ एका मताने पराभव केला. नगरपालिका आणि पंचायत समितीतील यशानंतर जिल्हा बँकेतही त्यांना बळ मिळाले.

पारंपरिक दोन गटातील संघर्ष हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सहकार क्षेत्रापर्यंत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटांचे कायमच प्रयत्न राहिले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजय पाटील यांनी मैदानात उतरून आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राजकीय मैदानात सक्रिय राहून त्यांनी ताकद पुन्हा उभी केल्याचे या निकालातून दिसून आले.

राजकीय समीकरणांना नवे वळण ?

तासगाव - प्रमोद चव्हाण

संजय पाटील यांना ४०, तर सुमन पाटील यांना ३९ मते मिळाली. या निकालाने निवडणुकीतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित केले. बहुतांश विकास सोसायट्यांवर रोहित पाटील गटाचे वर्चस्व असल्याची चर्चा असतानाही संजय पाटील यांनी विजय मिळवल्याने राजकीय गणितांबाबत उत्सुकता आहे.

तिसऱ्या आघाडीतील काही मतदारांनी संजय पाटील यांना साथ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चापेक्षा प्रत्यक्ष निकालाने तालुक्यातील राजकीय व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सहकारातील मतदारांशी असलेले संबंध, स्थानिक नेतृत्वाची भूमिका आणि मतदानाच्या दिवशीची रणनीती या बाबी निर्णायक ठरल्याचे मानले जाते.

निसटता पराभव...

विधानसभा निवडणुकीतील विजयाने रोहित पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदलते निकाल आणि जिल्हा बँकेतील निसटत्या पराभवामुळे ते नक्कीच आत्मपरीक्षण करून पुढील वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे.

खासदार विशाल पाटील यांचाच राहिला वरचष्मा

मिरज- प्रतिनिधी

जि ल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मिरज सोसायटी गटाच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, सहकाराच्या पटावर मोहरे बदलले तरी, डावाचे खरे सूत्रधार खासदार विशाल पाटील हेच आहेत. सलग १० वर्षांहून अधिक काळ स्वतः संचालक पद सांभाळल्यानंतर, यावेळी स्वतः रिंगणात न उतरता त्यांनी मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे यांना उमेदवारी दिली. हा निर्णय विशाल पाटील यांच्या राजकीय ताकदीचा कस लावणारा मानला जात होता. मात्र, अवघ्या ६८ मतदारांच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत कोरे यांनी ४६ मते मिळवून मिळवलेला एकतर्फी विजय हा विशाल पाटील यांचाच दबदबा अधोरेखित करतो.

एकेकाळी हा मतदारसंघ मदन पाटील यांचा अभेद्य बालेकिल्ला होता. त्यांच्या पश्चात या गटावर विशाल पाटील यांनी अत्यंत सूक्ष्म आणि नियोजनबद्ध बांधणी करत स्वतःची पकड निर्माण केली. या निवडणुकीत भाजप आमदार सुरेश खाडे यांनी आपले कट्टर समर्थक अनिल शेगुणशे यांच्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. शिवाय, जयश्री मदन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मदन पाटील यांना मानणारा पारंपरिक मतदार शेगुणशे यांच्या पाठीशी उभा राहून विशाल पाटील यांना धक्का बसेल, अशी विरोधकांची रणनीती होती.

परंतु, मतपेटी उघडताच, शेगुणशे यांना अवघ्या २१ मतांवर रोखत विशाल पाटील यांच्या यंत्रणेने विरोधकांचे मनसुबे उधळवून लावल्याचे दिसून आले. या निकालावरून हे स्पष्ट झाले की, जयश्री पाटील गटाच्या निष्ठावंत मतदारांनी भाजपऐवजी विशाल पाटील यांच्याच पारड्यात वजन टाकले. सहकारातील वर्षानुवर्षांचे सलोख्याचे संबंध आणि वसंतदादा घराण्यावरील निष्ठा पक्षादेशापेक्षा वरचढ ठरली. सत्ताधारी भाजपचे तगडे आव्हान परतवून लावत एका सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या फरकाने विजयी करणे, ही विशाल पाटील यांच्या रणनीतिक परिपक्वतेची साक्ष आहे. मिरज सोसायटी गटातील सहकाराची नाडी अजूनही विशाल पाटील यांच्याच हातात असल्याचे या निकालाने निर्विवादपणे दाखवून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT