Sangli District Bank Pudhari File Photo
सांगली

Sangli Politics : शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने

‘अ’ मतदारसंघात तानाजी पाटील यांच्याविरोधात देशमुख-पडळकरांपैकी कोण उतरणार?

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत भंडारे

आटपाडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यातील ‘अ’ मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गत निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेत प्रवेश मिळविणारे शिवसेनेचे विद्यमान संचालक तानाजी पाटील यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. त्यामुळे तानाजी पाटील यांना रोखण्यासाठी भाजपचा उमेदवार कोण?, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने-सामने आहे. त्यामुळे आटपाडीतील ‘अ’ मतदारसंघाची लढत केवळ सहकाराची न राहता तालुक्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचीही कसोटी ठरणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रियेपासूनच पडघम वाजू लागले. सोसायटी गटातून बँकेत प्रवेश मिळविण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी ठरावांवर लक्ष केंद्रित केले आहे. आटपाडी तालुक्यात विद्यमान संचालक तानाजी पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने सोसायटीनिहाय मोर्चेबांधणी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख आणि ब्रम्हानंद पडळकर यांनी भाजपच्या बाजूने ताकद लावली आहे. गतवेळी विरोधात असलेले हणमंतराव देशमुख आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विठलापूर, भिंगेवाडी आणि करगणी येथील सोसायट्यांच्या प्रतिनिधी निवडीदरम्यान निर्माण झालेली धुसफूस आता बाजूला सारून भाजपने ‘अ’ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या सान्निध्यात आहेत. त्यामुळे त्यांचा कल तानाजी पाटील यांच्या बाजूने राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. काँग्रेसचे जयदीप भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नेलकरंजी व परिसरातील सोसायट्यांचे राजकीय गणितही बदलले आहे.

जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान बदललेला राजकीय पट आणि बदलती समीकरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. स्वाभिमानी आघाडीचे भारत पाटील आणि शेटफळेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गायकवाड यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT