सांगली जिल्हा बँक pudhari File Photo
सांगली

Sangli News| जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ३५१ अर्ज

आजी-माजी खासदार, आमदारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : ​सोमवारी अर्जांची छाननी

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. गुरुवारी शेवटच्या दिवशी एकाच दिवशी १४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामुळे बँकेच्या एकूण २१ संचालक पदांच्या जागांसाठी तब्बल ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची आणि रंजक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल २२ सप्टेंबर रोजी वाजला होता. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली. गुरुवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळली होती. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या टोकाला पोहोचला असून, या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांनी आपापली ताकद पणाला लावली आहे.

या निवडणुकीत खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार सुमन पाटील यांच्यासह आमदार इद्रिस नायकवडी अशा अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व राजकीय दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत.

आता सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अर्जांच्या छाननीकडे लागले आहे. अर्जांची संख्या मोठी असल्यामुळे छाननीच्या वेळी राजकीय नाट्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदेशीर त्रुटींच्या आधारे कोणाचा अर्ज बाद होणार आणि कोण रिंगणात कायम राहणार, यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. छाननीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT