Sangli District Bank pudhari photo
सांगली

Sangli District Bank : सांगली जिल्हा बँक अध्यक्ष निवड १८ तारखेला

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून सभेची नोटीस; संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी संचालक मंडळाच्या सभेसाठी गुरुवारी नोटीस काढली आहे. या निवडीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार आणि निवडणूक होणार की बिनविरोध निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता लागली आहे.

अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे महेंद्र लाड, आमदार विश्वजित कदम आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील हे शर्यतीत आहेत; तर उपाध्यक्षपद शिवसेना अथवा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून, सेनेकडून तानाजी पाटील तर राष्ट्रवादीकडून वैभव शिंदे आणि संभाजी कचरे यांची नावे चर्चेत आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित ६ जागांच्या मतमोजणीत राजकीय दिग्गजांनी आपले वर्चस्व राखले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अध्यक्षांची निवड करणे प्रशासकीयदृष्ट्या बंधनकारक असल्याने १८ नोव्हेंबरला नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संचालक मंडळामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सहा संचालक असल्याने पहिले अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याचे संकेत आहेत; मात्र बदललेल्या समीकरणांमुळे ही निवड सर्वसंमतीने होणार की संघर्षातून, याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT