Sangli District Bank pudhari photo
सांगली

Sangli District Bank : जिल्हा बँक अध्यक्ष पदाचा आज फैसला

अध्यक्षपदी काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संचालक तानाजी पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार, दि. १८ रोजी होत आहे. या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार अध्यक्षपदी काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संचालक तानाजी पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडी आणि महायुतीची स्वतंत्र बैठक होणार असून, त्यात अंतिम नावे निश्चित केली जाणार आहेत. ​नूतन संचालक मंडळाची ही पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. निवडणुकीत २१ पैकी १५ संचालक बिनविरोध निवडून आले, तर सहा जागांसाठी मतदान झाले होते. एकूण २१ संचालकांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सहा, भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तीन, असे पक्षीय बलाबल आहे. आकड्यांच्या गणितात महायुतीचे अकरा आणि महाविकास आघाडीचे दहा संचालक दिसत असले, तरी प्रत्यक्ष सत्तेची समीकरणे बदलली आहेत.

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) संचालक रणधीर नाईक यांनी आपण महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे, तर माजी खासदार संजय पाटील यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील सत्तेच्या धर्तीवर शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील आणि त्यांचे एक सहकारी महाविकास आघाडीला साथ देण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड आहे.

महाविकास आघाडीअंतर्गत सर्वाधिक जागा असलेल्या काँग्रेस पक्षाला अध्यक्ष पद देण्याचा निर्णय यापूर्वीच नेत्यांच्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार काँग्रेसकडून ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द झाल्याने आता निवडीच्या दिवशीच सकाळी अकरा वाजता होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. या बैठकीत नावांवर एकमत होऊन निवडणूक बिनविरोध होणार, की प्रत्यक्ष मतदान करावे लागणार, याचा फैसला होणार आहे.

भाजप नेत्यांत एकमत होईना?

जिल्हा बँक पदाधिकारी निवडीही सर्वसंमतीने व्हाव्यात, यासाठी मंगळवारी बैठक होणार होती, मात्र ही बैठक झालीच नाही. त्यावरून भाजप नेत्यांमध्येच एकमत होत नसल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT