Administrator
सांगली

Gold smuggling case: दिघंचीतील एकाकडून 55 कोटींची सोने तस्करी

गुवाहाटी पोलिसांकडून अटक : ३७ किलो सोने जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे म्यानमार, मध्य-पूर्वेसह महाराष्ट्रापर्यंत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आसाममधील गुवाहाटी पोलिसांनी मोठ्या कारवाईत आंतरराष्ट्रीय सुवर्ण तस्करीचा पर्दाफाश केला. यात सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील अक्षय बनसोडे या तरुणाला अटक केली आहे. आसाममधील खारघुली परिसरातून सुमारे ५५ कोटी रुपये किमतीचे तब्बल ३७ किलो संशयास्पद तस्करीचे सोने जप्त केले. या तस्करीचे धागेदोरे थेट म्यानमार, मध्य-पूर्व देश आणि भारतातील प्रमुख शहरांत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

गुवाहाटीजवळील लाताशिल पोलिस ठाण्याच्या पथकाला या तस्करीबाबत विशिष्ट गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी खारघुली परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. सुरुवातीला पोलिसांना मिळालेल्या माहितीतील सोन्याबाबत काहीशी साशंकता होती; मात्र संशयितावर पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून झडती घेतली असता ३७ किलो सोने मिळाले.

या आंतरराष्ट्रीय तस्करीप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातील अक्षय बनसोडे याला अटक केली असून तो शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शारीरिक स्थितीमुळे पहिल्या नजरेत कोणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता. याच गोष्टीचा गैरफायदा घेत तो सोन्याची वाहतूक करत होता.

बनसोडेवर यापूर्वी दोन वेळा कारवाई

पोलिसांच्या प्राथमिक तपासात बनसोडे यापूर्वीही दोन वेळा सोन्याच्या तस्करीमध्ये ‘कॅरियर’ म्हणून सक्रिय असल्याची माहिती उघड झाली. त्याची ही तिसरी वेळ. यापूर्वी त्याने सुमारे २० किलो सोन्याची अशाच प्रकारे यशस्वी वाहतूक केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

रेल्वेनेच प्रवास, इंटरनेट कॉलिंग

दिघंचीतील अक्षय बनसोेडे हा रेल्वेतून प्रवास करत असे. यापूर्वी दोन वेळा त्याने रेल्वेतूनच प्रवास केलेला होता, असे तपासात समजले आहे. रेल्वेद्वारेच त्याने वीस-वीस किलो सोने दोनवेळा पोहोच केलेले होते. रेल्वे प्रवासामुळे कोणालाही संशय येत नसे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. गुवाहाटी येथून मणिपूर वगैरे ठिकाणी सोने पाठवले जायचे. या तस्करीशी संबंधित गुन्हेगार इंटरनेट वापरूनच संभाषण करत असत. मोबाईलचा वापर करत नसत. त्यांचा संवाद कोणाकोणाशी होत असे, याची माहिती मिळालेली आहे. लवकरच ते गजाआड होतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT