पारे : पाडळी (ता. खानापूर) येथे चार दिवसापूर्वी एका रात्रीत तब्बल सहा घरे फोडून चोरट्यांनी ग्रामस्थांची झोप उडवली आहे. ही भीती अद्यापही मनातून गेलेली नाही, तोपर्यंत अगदी त्याच पद्धतीने धामणी गावातही चोरट्यांनी हात मारला. गावातील दोन घरांना लक्ष्य बनवत चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, धामणी येथील पोपट राजाराम शिंदे हे सिद्धनाथ यात्रेनिमित्त परिवारासह म्हसवड (जि. सातारा) येथे गेले होते. तसेच गावातील रोहित शिंदे यांच्या घरातील सर्वजण परगावी होते. यामुळे ही दोन्ही घरे बंद होती. बंद घरांवर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटे विस्कटली. साहित्याची उलथापालथ केली. पोपट शिंदे यांच्या घरातील कपाटामधून पंचवीस हजार रुपये रोख, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि जवळपास 250 ग्रॅम चांदीचे दागिने, असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.
रोहित शिंदे यांच्या घरातून तीन हजार रुपये रोख, दीडशे ग्रॅम चांदीचे दागिने, तसेच 2 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिस ठाण्याचे हवालदार अमित परीट, सूरज जगदाळे आणि विवेक यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.