देवराष्ट्रेत विजेच्या धक्क्याने दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू 
सांगली

Sangli Crime| देवराष्ट्रेत विजेच्या धक्क्याने दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू

मोहिते वडगाव रस्त्यालगत वैरण काढताना घटना

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे जनावरांसाठी वैरण आणण्याकरिता शेतात गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी देवराष्ट्रे-मोहिते वडगाव (चिंचणी रोड) परिसरात घडली. शिवाजी खाशाबा मदने (वय ५५) आणि अभिजित लालासाहेब शिरतोडे (वय २६, दोघेही रा. देवराष्ट्रे) अशी मृतांची नावे आहेत.

शिवाजी मदने आणि अभिजित शिरतोडे हे दोघे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी रस्त्यालगतच्या शेतात गेले होते. वैरण काढत असताना अचानक त्यांना विद्युतप्रवाहाद्वारे जोरदार धक्का बसला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी चिंचणी वांगी पोलिसांनी पाहणी केली. चिंचणी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी स्वप्निल शिवाजी मदने यांनी दिलेल्या माहितीवरून चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास चिंचणी वांगी पोलिस करत आहेत. रोजच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या दोन व्यक्तींचा असा अचानक अंत झाल्याने देवराष्ट्रे आणि परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT