Sand Mining Pudhari
सांगली

Sangli News : देशमुखवाडीत वाळू माफियांवर ‌‘महसूल‌’चा छापा

माण नदीपात्रातील अवैध उत्खनन उघड; पाठलाग करून जेसीबी जप्त

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः देशमुखवाडी (ता. आटपाडी) परिसरातील माण नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास तहसीलदार शीतल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून वाळू उत्खननासाठी वापरला जाणारा जेसीबी जप्त केला. जप्त केलेले वाहन पुढील कार्यवाहीसाठी आटपाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार आणि प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. देशमुखवाडी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही नियोजनबद्ध कारवाई केली.

शनिवारी मध्यरात्रीनंतर महसूल विभागाचे पथक माण नदीपात्रात दाखल झाले. यावेळी नदीपात्रात वाळू उपशासाठी वापरला जाणारा जेसीबी आढळून आला. प्रशासनाचे वाहन दिसताच चालकाने जेसीबी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल कर्मचारी आणि पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून हे वाहन ताब्यात घेतले. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी विनायक पाटील, विनायक बालटे, नितीन नाईक, नितीन सानप, प्रशांत जाधव तसेच पोलिस कॉन्स्टेबल कोळेकर यांनी सहभाग घेतला.

तस्करांचे धाबे दणाणले

तहसीलदार शीतल बंडगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे वाळू तस्करांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अशा धडक मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT