सांगली : राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराच्यावतीने उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर आणखी सात शहरांसाठी जादा बसेस सोडणार आहेत. यापूर्वीच 70 जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या सर्व जादा फेऱ्या 15 जूनपर्यंत धावतील.
जिल्ह्यातून 15 एप्रिलपासून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. चार दिवसांत प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहता, नियोजनात भर घालत आणखी सात लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या बसेसचे आरक्षण संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सांगली आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे आणि कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल माने यांनी ही माहिती दिली.