कडेगाव : सध्या पाण्याने ताकारी कालवा असा भरून वाहत आहे.  
सांगली

Sangli News : ताकारीचे आवर्तन सलग सुरू ठेवण्याची मागणी

उन्हाची तीव्रता वाढली; पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ताकारीचे आर्वतन सुरू आहे. सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता आहे. पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे हे आर्वतन बंद न करता तसेच सलग सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. लाभक्षेत्रातील संपूर्ण शेतीला पाणी देऊन आता हेच पाणी कालव्याच्या उलट्या दिशेने देण्याचे सुरू केले आहे.

ताकारी मुख्य कालव्यातून सोडलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन, शेतकऱ्यांकडून पिकांसाठी होणारा सतत पाणी उपसा यामुळे जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. खानापूर, तासगाव तालुक्यानंतर आता हे पाणी सध्या कडेगाव तालुक्यात टप्प्या-टप्प्याने कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ताकारी योजनेचे आवर्तन सुरू असल्याने ऐन उन्हाळ्यात कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परंतु सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्याने उसासह अन्य पिकांना भरपूर पाण्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ताकारीचे हे सुरू असलेले आर्वतन जून महिनाअखेर सुरू राहणे शेतकऱ्यांच्यादृष्टीने गरजेचे आहे. अन्यथा पिके वाळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ताकारी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम झाल्यापासून कालव्यातून पाणी झिरपण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी पाणी बंद होताच परिसरातील विहिरी, बंधारे, ओढे, तलाव यांना मोठा फटका बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT