सांगली : शेतमजुरांना दुष्काळी मदत म्हणून २५ हजार रुपये अनुदान मिळावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे कमी झाली असून शेतमजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, अन्नधान्य खरेदी, मुलांचे शिक्षण आणि आरोग्याचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दिवाळीचा सण साजरा करणेही अशक्य होत आहे.
त्यातच बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाल्याने भूमिहीन शेतमजूर कुटुंबे मोठ्या संकटात सापडली आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्या जात असताना, शेतीत प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांनाही तातडीने दिलासा मिळणे गरजेचे आहे. शेतमजूर कुटुंबांना संकटातून सावरण्यासाठी २५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची विशेष योजना जाहीर करावी. भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. रेशन दुकानांवर धान्यासोबत साखर, खाद्यतेल, डाळी, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सहस्रबुद्धे, विजय बचाटे, परशुराम कुंडले यांच्यासह कार्यकर्ते व शेतमजूर सहभागी झाले होते.