सांगली : येथील वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या रुग्णालयातील १०८ पदे भरण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर केलेला पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण पत्रव्यवहाराला यश आले आहे, अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली.
वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील नोकरभरतीचा विषय यापूर्वी महानगरपालिकेच्या महासभेत चर्चेला आला होता. त्या वेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी यापूर्वीची नोकरभरती प्रक्रिया रद्द करून, रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व पदांना शासनाची मंजुरी मिळवून ती पदे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच रुग्णालय प्रभावीपणे सुरू करण्याची भूमिका मांडली होती. त्यानुसार सर्व पदे मंजूर करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या प्रयत्नांना यश येऊन शासनाकडून १०८ पदे भरण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. शासन आदेशानुसार आवश्यक पदे भरून रुग्णालय सुरू करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सांगली शहरासह मिरज व कुपवाड परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि बहुविशेषज्ञ वैद्यकीय सेवा महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी, तसेच वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे, यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.