सांगली

सांगली : मनपात भाजपच्या पार्टी मिटिंगमध्ये वादावादी

अमृता चौगुले

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांच्या मिटिंगमध्ये जोरदार वादावादीचे प्रकार घडले. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील पॅव्हेलियन बिल्डिंग नामकरण व प्रभाग 19 मधील नाल्याचा विषय वादास कारण ठरला.
महापालिकेची महासभा शुक्रवारी आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी गटनेते विनायक सिंहासने होते. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील पॅव्हेलियन बिल्डींगला (कै.) वसंतराव अग्रवाल असे नामकरणास अंतिम मान्यता देण्याचा विषय महासभेपुढे आला आहे. या विषयाला विरोध व समर्थन यावरून नगरसेवक विवेक कांबळे व नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यात जोरदार वादावादी झाली.

प्रभाग क्रमांक 19 मधील खुला केलेला नाला मुजवल्यावरून गटनेते विनायक सिंहासने व नगरसेविका सविता मदने यांच्यात वादावादीचा प्रकार घडला.
आमराई, महावीर उद्यान, चिल्ड्रन पार्कला प्रवेश शुल्क आकारण्याचा विषय महासभेपुढे आला आहे. भाजप नगरसेवकांच्या बैठकीत प्रवेश शुल्कला विरोध करण्याचा निर्णय झाला.

'एलईडी'वरून अधिकारी धारेवर

'एलईडी' पथदिवे प्रकल्पाचे काम रखडल्यावरून व दुरुस्तीअभावी पथदिवे बंद असल्यावरून नगरसेवकांनी सहायक आयुक्तांना धारेवर धरले. पथदिवे दुरुस्ती साहित्य अभावी अनेक प्रभागात अंधाराचे साम्राज्य आहे. दुरुस्ती साहित्य खरेदी करावे व त्याची रक्कम सहायक आयुक्त कुंभार यांच्या वेतनातून वसूल करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

महासभा रद्द करा; ऑफलाईन सभेत विषय घ्या

महासभेपुढील विषय तसेच एक (ज) अंतर्गत आलेले विषय तीनही शहरांच्या हिताच्या संबंधीचे आहेत. या विषयांमध्ये सुधारणा, त्यातील धोके ऑनलाईन सभेत मांडता येत नाहीत. जनतेच्या हिताचे निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारी महासभा रद्द करून ऑफलाईन सभेचा शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ही सभा व विषयपत्रावरील सर्व विषय ऑफलाईन सभेत घ्यावेत, अशी मागणी भाजपतर्फे गटनेते सिंहासने यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली. त्याबाबत त्यांना निवेदन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT