आटपाडी : ‘तुम्हाला ठार मारण्याची सुपारी आली आहे. जीव वाचवायचा असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमचा काटा काढू’, अशी थेट धमकी देऊन गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील कापड व्यावसायिकाकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ऋतिक सुनील माने उर्फ मोन्या (रा. करंजे, भिवघाट, ता. खानापूर) याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बबनराव पितांबर दबडे (वय ५४, रा. गोमेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संशयित ऋतिक माने हा करगणी (ता. आटपाडी) येथील लक्ष्मीनगरमध्ये फिर्यादीचे चुलत भाऊ सुबराव गंगाराम दबडे यांच्या घरी गेला होता. तेथे त्याने बबनराव दबडे यांना ठार मारण्याची सुपारी आल्याचे सांगून, त्यातून मार्ग काढायचा असेल तर दहा लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली.
चुलत भावाने हा धमकीचा निरोप १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी बबनराव दबडे यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८(४) अन्वये खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.