सांगली : जिल्हा बॅँकेत माजी संचालकांच्या काळातील ८२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणातून संबंधित सर्व आजी-माजी संचालक व तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लिन चीट मिळाली आहे. चौकशी अधिकारी तथा निवृत्त न्यायाधीश एम. आर मखरे यांनी चौकशीत एकही आरोप सिध्द झाला नसल्याचे म्हटले असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व त्याखालील नियम ७२ नुसार प्रस्तुत चौकशी प्रकरण हे सबळ पुराव्याअभावी अंतिमत: रद्द करून निकाली काढण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेच्या आजी, माजी संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे; तर जिल्हा बॅँकेवर याप्रकरणी सतत आरोप करणारे आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांच्या तक्रारीवरून सहकार विभागाने चौकशी सुरू केली. मागील संचालक मंडळातील काही संचालक पुन्हा निवडून आल्याने आजी व माजी संचालक तसेच तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती. चौकशीविरोधात संचालकांनी केलेल्या अपिलावर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी या चौकशीला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवून दोषींवर कारवाईची मागणी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात केल्यानंतर ही चौकशी पुन्हा सुरू झाली. आ. पडळकर व आ. खोत यांनी सातत्याने आरोप करून जिल्हा बॅंक व संबंधितांना टार्गेट केले होते. जिल्हा बँकेवर मोर्चाही काढला होता .
चौकशीत प्रथम संबंधित संचालक व तत्कालीन, विद्यमान अधिकाऱ्यांवर चार प्रकरणात बँकेचे ५० कोटी ५८ लाख ८७ हजार ८८० रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत याची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यासाठी कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीतून अनेक मुद्दे वगळल्याची तक्रार आ. खोत व आ. पडळकर यांनी पुन्हा शासनाकडे केली. यानंतर शासन आदेशाने चौकशीत नव्याने सहा प्रकरणांचा समावेश करत बँकेचे ३१ कोटी ३२ लाख ८ हजार ३३४ रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे एकूण दहा प्रकरणांत बँकेच्या ८१ कोटी ९० लाख ९६ हजार २१४ रुपयांच्या नुकसानीप्रकरणी जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालक, तत्कालीन व विद्यमान अधिकारी यांची चौकशी सुरू होती.
आ. खोत व आ. पडळकर यांच्या मागणीवरून शासनाने या चाैकशीसाठी काही महिन्यांपूर्वी निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांची नियुक्ती केली आहे. मखरे यांनी आजी-माजी संचालकांसह ५७ जणांवर चौकशीतील दहापैकी तीन प्रकरणात आरोप ठेवले होते. अन्य सात प्रकरणांतील सुमारे ६५ कोटींच्या नुकसानीप्रकरणी संबंधितांना मखरे यांनी यापूर्वीच क्लिन चीट दिली आहे. उर्वरित संगणक खरेदी, फर्निचर व जाहिरातीचा खर्च या प्रकरणात सुमारे १६ कोटी ५९ लाखांचे बँकेचे नुकसानप्रकरणी सुनावणी सुरू होती.
सदरची सुनावणी पूर्ण होऊन चौकशी अधिकारी तथा निवृत्त न्यायमूर्ती मखरे यांनी आपला अंतिम निकाल दिला आहे. त्यात या सर्वच प्रकरणात आजी व माजी संचाकलांना क्लिन चीट देण्यात आली आहे. सदरचे चौकशी प्रकरणच मखरे यांनी अंतिमत: रद्द करून निकाली काढले आहे.