विश्वजित कदम  Pudhari News Network
सांगली

Sangli DCC Bank| जिल्हा बँकेतील सत्तेने काँग्रेसला झळाळी

सत्ताकेंद्र वाळव्याकडून पलूस-कडेगावकडे

पुढारी वृत्तसेवा

- सुरेश गुदले

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड अपेक्षेप्रमाणे झाली. अपेक्षेप्रमाणे म्हणजे काय, तर अध्यक्षपदी महेंद्र लाड, उपाध्यक्षपदी तानाजी पाटील... सुरुवातीची ही अटकळच खरी ठरली. ग्रामीण विशेषतः कृषी अर्थकारणाची वाहिनी असलेल्या या बँकेची सत्ता काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पटकावली. ते काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आमदार. जिल्हा बँकेवर दोन दशकांनंतर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात त्यांना आणि समविचारी सहकाऱ्यांना यश आले. राज्यात लातूर आणि सांगली या दोनच जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, असे सध्या तरी दिसते. सत्तेपासून दूर गेलेली काँग्रेस, पक्षातील फूट आणि नेत्यांचे पक्षांतर, अशा प्रतिकूल नेपथ्यामध्येही आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. त्यामुळे त्याची झळाळी जास्तच. मागे वळून पाहताना लोकसभा निवडणुकीत झालेला काँग्रेस विचारांचा विजय लक्षात घ्यावाच लागेल. अर्थातच जरी खासदार विशाल पाटील अपक्ष असले तरी, त्यांच्या विजयामध्येही आमदार कदम यांची भूमिका महत्त्वाची होती.

लोकसभा मैदानानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातही आमदार कदम यांनी स्वतः गुलाल उधळला. त्यानंतर नंबर लागला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा. या रिंगणातही काँग्रेसने १८ जागा जिंकल्या. पलूस नगरपरिषद, कडेगाव पंचायतीतही त्यांनी काँग्रेसची सत्ता आणली. जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून रोखण्यातही समविचारी मंडळी यशस्वी ठरली. जिल्हा परिषदेप्रमाणेच त्यांनी जिल्हा बँकही ताब्यात घेतली. म्हणजेच लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता जिल्हा बँकेतही काँग्रेस. याचे श्रेय आमदार विश्वजित कदम यांना द्यावे लागेल. केंद्रात, राज्यात सत्ता नसताना, संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे, नेमके आणि नेटके नियोजन करून सत्तेचा सोपान त्यांनी गाठला. सत्ता असतानाचे कैक मार्ग सोेपे असतात, पण सत्ता नसताना गट-तट बांधून ठेवणे, त्यांना नानाविध कामांविषयी आश्वस्त करणे जिकिरीचे असते, मात्र ते त्यांनी जमवून आणले. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांना वाटले आणि ते सहभागी झालेही, हेही येथे लक्षात घ्यावे लागेल.

जिल्हा बँक म्हणजे प्रचंड ताकदीचे आर्थिक सत्ताकेंद्र. सांगली जिल्हा बँकेची उलाढाल तर तब्बल १८ हजार कोटींवर. अर्थातच येथे कारखाने, बँका, पतसंस्था, दूध संघ आदी संस्थात्मक आर्थिक ताकदीच्या बळावर राजकारण केले जाते, हा बाकी इतिहास. ‘बँकेचे कामकाज आम्ही पक्षविरहित चालवू’, ‘बँक ही पक्षीय राजकारणापासून दूर ठेवा’ आदी भरतवाक्ये ‘हास्यजत्रा’मधील संवाद म्हणून ठाकठीकच, परंतु ती स्वीकारायला इतिहास परवानगी देत नाही. त्यामुळेच अशी आर्थिक सत्ता ताब्यात घेण्यासाठी काय-काय केले जाते, ते ‘गोकुळ’च्या निमित्ताने राज्याने पाहिले. ‘गोकुळ’साठी जोरदार लढा देऊनही राजसत्तेने काय केले, तेही लोकांनी अनुभवले. या पार्श्वभूमीवर शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार विश्वजित कदम आणि सहकाऱ्यांनी नेमकेपणाचे राजकारण करून सत्ता मिळवली. या बँकेवर आमदार जयंत पाटील यांचा दीर्घकाळ एकछत्री अंमल होता. त्याला आता छेद गेला आहे. मावळते अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी जरी बँकेचा कारभार पाहिला असला, तरी नेतृत्व होते अर्थातच जयंत पाटील यांचे. नव्या समीकरणांनंतर आता आमदार डॉ. विश्वजित कदम नेतृत्व करतील, अशी मांडणी होताना दिसते.

अर्थात जयंत पाटील यांनीही यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत फारसा रस दाखविला नाही. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फोन केल्याचे सांगत त्यांनी एक-दोन बैठका घेतल्याही. १५ जागा बिनविरोध झाल्यानंतर सहा जागांसाठी लागलेली निवडणूक, त्यानंतर अर्ज दाखल करतानाच त्यांना कट्टर विरोधक मानणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावरील हरकती, उच्च न्यायालयात पडळकर यांचा अर्ज अवैध ठरणे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रक्रिया वैध ठरणे... त्यानंतर निवडणुकीत झालेला पडळकर यांचा विजय... या साऱ्या घडामोडींमध्ये पडळकर यांच्याकडून सातत्याने जयंत पाटील यांनाच ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न झाला. पण पाटील यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. प्रत्यक्ष निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या जागा जास्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोर सोडून दिले.

आता बहुतांशी सत्ताकेंद्रे काँग्रेसच्या ताब्यात आहेत. जिल्हा बँकेवर तर लोकांचा विशेषतः शेतकरी वर्गाचा मोठा विश्वास आहे, तो वाढेल असा कारभार आता अपेक्षित आहे. संचालकांची तसेच बड्या कर्जदारांच्या कोट्यवधींच्या कर्जाची आकडेवारी सामान्यांवर सतत आदळत असते. मोठ्या कर्जदारांना होणारे आर्थिक लाभ, दिल्या जाणाऱ्या सवलती, 'फिरवाफिरवी' करून दिले जाणारे लाभ, याविषयी लोकभावना तीव्रतेने व्यक्त होत असते. या लोकभावनेची यथोचित दखल सारे सगेसोयरेच असणारी संचालक मंडळी घेतील, अशी अपेक्षा करावी का? तूर्त इतकेच, पण यानिमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेसला उभारी मिळाली, या भरतवाक्यावर थांबता येईल.

वाढीस लागावा सेवाभाव...

जिल्हा बँकांसमोर खासगी बँकांचे आव्हान आहे. या आव्हानांसह कारभार करत असताना सरकारचेही भलतेच प्रेम राहणार आहे. अशा स्थितीत बँकांच्या सर्व शाखांतून तंत्रस्नेही कामकाज चालविण्याची गरज आजची तातडीची आहे. खासगी बँकांत गेल्यास दोन-चार मदतनीस मदतीसाठी धावून येतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांच्या स्थिती-गतीचा चेहरा काय सांगतो? याचा अर्थ बँकेच्या सर्व शाखा, कार्यालये मध्यवर्ती वातानुकूल (सेंट्रल एसी), कॉर्पोरेट करा, असे नव्हेच नव्हे, पण किमान स्वच्छता, पुरेसा प्रकाश, पिण्याच्या पाण्याची यथोचित व्यवस्था, टकाटक स्वच्छतागृहे, या अपेक्षा अनाठायी कशा म्हणता येतील? सर्वात लाखमोलाचे म्हणजे कर्मचाऱ्यांतील सेवाभाव. तो वाढण्यासाठी अशिक्षित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी मदतनीस ठेवा. नानाविध अर्ज भरून देण्यास लोकांना मदत करा. किमान काही कर्मचारी तरी खुर्चीला फेव्हिकॉल न लावता लोकांसाठी 'पळून खेळतील' तो सुदिन.

विरोधी गाणे कसे असेल?

लोकशाही व्यवस्थेत विरोधक पाहिजेच पाहिजे. सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत विरोधकांचे अवकाशच गिळंकृत केले जात आहे. भारतातच नव्हे, तर जगभरातील कैक देशांमध्येही असे चित्र आहे. निरंकुश सत्ता उपभोगण्यासाठी विरोधक आपलीच कळसूत्री बाहुली राहील, अशी बतावणी असते. अशा भवतालात बँकेत सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर यांची ‘एंट्री’ झालेली आहे, होय, ‘एंट्रीच.’ ते राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आणि बँकेत विरोधकांच्या पार्टीत. आता पडळकर कसा आणि किती, कोणत्या बाबींना विरोध करतात तेही लवकरच क‍ळेल. तसेच विरोधासाठी कोणत्या स्तराची भाषा ते वापरतात, तेही समजेल. विरोध विधायक असणार, की तेही ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’ गाताना दिसणार, हाही प्रश्नच... कारण त्यांचे दोर त्यांच्या हाती नाहीत.

सर्व सेवा आणखी लोकाभिमुख व्हाव्यात

बँकेच्या सर्व प्रकारच्या सेवा आणखी लोकाभिमुख करण्याची गरज आहे. जिल्हा बँक म्हणजे बडे कारखानदार, त्यांची मोठी कर्जे, शेतकऱ्यांची पीककर्जे, उसाची बिले, याच्याही पलीकडे खूप काही आहे. ते काय आहे, याची सर्वदूर किती माहिती असते? जिल्हा बँक गृहकर्ज देते, वाहनकर्ज देते, शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, एवढेच नव्हे, तर बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणाऱ्या अनेक योजना बँकेकडे आहेत. त्यांचा प्रचार आणि प्रसार कितीसा झालेला आहे? गावा-गावात शेतकऱ्यांशी, लोकांशी बोलल्यावर काय चित्र दिसेल? बघा बोलून...

सावध ऐका... दुष्काळाच्या झळा

यंदा दुष्काळाचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते. विशेषतः पुढील पावसाळ्यात अपेक्षित पाऊस झाला नाही, तर पीकपाण्याची स्थिती आणखी गंभीर रूप धारण करू शकते. या पार्श्वभूमीवर बँकेचा कारभार काटकसरीने केला जाईल, शेतकऱ्यांना नानाविध योजना राबवून दिलासा दिला जाईल, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष महेंद्र लाड व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी पदभार हाती घेतानाच दिली आहे. तसेच घडो, या सदिच्छा..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT