सांगली : तरुणीने लग्नास नकार दिल्याने नैराश्यातून खण भागातील राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. दुर्वांक प्रमोद शेवाळे असे मृताचे नाव आहे. संबंधित तरुणीने लग्नासाठी स्वतःचा धर्म स्वीकारण्याची अट घातली होती, यावरून झालेल्या वादातून आणि नैराश्यातून दुर्वांकने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सांगली शहर पोलिस या प्रकरणाचा तपास दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दुर्वांक हा पुणे येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो सांगलीत आला होता. त्याच्या घराजवळ मूळची कोल्हापूरची तरुणी तिच्या आजीकडे राहण्यासाठी वरचेवर येत होती. यातूनच या दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले, मात्र संबंधित तरुणीने ‘लग्नासाठी धर्म स्वीकारावा लागेल’ अशी अट घातली होती. त्यामुळे तो काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. गुरुवारी दुपारी याच विषयावरून फोनवर बोलत असताना त्याने घरात गळफास लावून घेतला.
नातेवाईकांनी दुर्वांकच्या आईचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये दुर्वांक आणि संबंधित तरुणीमधील धर्म परिवर्तनाच्या अटीसंदर्भातील सर्व संभाषण (चॅटिंग) आढळून आले. नातेवाईकांनी ते पोलिसांना दाखवूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई किंवा तपास सुरू केलेला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दुर्वांकला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.