कडेगाव ः ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे उसाच्या वाढ्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीनंतर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनायक प्रभाकर ढाणे (वय 35, रा. ढाणेवाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
ढाणेवाडी येथे विनायक यांच्या चुलत्यांची ऊस शेती आहे. गुरुवार, दि. 29 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उसाचे वाढे देण्यावरून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संबंधित तरुणांनी विनायक यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर विनायक यांची प्रकृती अचानक खालावली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने कडेगाव येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
विनायक यांचा मृत्यू नक्की मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने, याबाबत उशिरापर्यंत नेमकी माहिती समोर आली नव्हती. उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, किरकोळ वादातून एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याने कडेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.