चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू File Photo
सांगली

Sangli Crime : चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

सांगलीतील अष्टविनायकनगर परिसरातील घटना ः दोन भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विजयनगर परिसरातील अष्टविनायकनगर येथे उसने घेतलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून चाकूने भोसकलेल्या सूरज राजू कांबळे (वय 19, रा. वारणाली रस्ता, गणेश कॉलनी) या तरुणाचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी निहाल रियाज रंगारी आणि बिलाल रियाज रंगारी या दोन भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत सूरज कांबळे हा पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम करत होता. त्याने संशयित रंगारी बंधूंकडून काही पैसे उसने घेतले होते. संशयितांचे चिकन विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री सूरज त्याचा मित्र आर्यन मड्डी याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना, अष्टविनायकनगरमधील गल्ली क्रमांक 8 मध्ये संशयितांनी त्यांना अडवले. उसने घेतलेल्या पैशांची मागणी करत त्यांनी सूरजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयितांनी सूरजवर चाकूने हल्ला केला.

हल्ल्यानंतर सुरजचा मित्र आर्यन तिथून पळून गेला, तर गंभीर जखमी सूरज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र सोमवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अटकेत असलेल्या दोन्ही भावांवर खुनाचे कलम वाढवले आहे.

...तर घटना टळली असती

विजयनगर परिसरात महिन्याभरापूर्वी एका नशेखोर टोळीने कामगाराला बेदम मारहाण करत धिंगाणा घातला होता. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी पुराव्यांसह तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी केवळ जुजबी कारवाई करून संबंधितांना सोडून दिले होते. पोलिसांच्या या मवाळ धोरणामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आणि परिसरात दादागिरी सुरू झाली. जर त्याच वेळी पोलिसांनी कडक कारवाई केली असती, तर सूरजचा खून झाला नसता, अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT