सांगली : शहरात बिअर शॉपची जुनी उधारी मागितल्याच्या कारणावरून तरुणाला कानाखाली मारून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत कटरने वार करण्यात आले. या प्रकरणी प्रशांत दिलीप चौगुले (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अभिषेक दशरथ कोतवाल (वय 26, रा. खणभाग, सांगली) हे शुक्रवार, दि. 29 रोजी रात्री आपल्या घरी जात होते. ते आंबेडकर रोडवरील मद्रासी कॉलनीच्या कोपऱ्यावर आले असता, त्यांना त्यांच्या ओळखीचा प्रशांत चौगुले तिथे थांबलेला दिसला. अभिषेक यांनी प्रशांतकडे ‘बिअर शॉप’च्या उधारीच्या पैशांची मागणी केली. यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली.
पैसे मागितल्याच्या रागातून प्रशांतने अभिषेक यांना प्रथम कानाखाली मारून व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर फळे कापण्याच्या कटरने अभिषेक कोतवाल यांच्या डाव्या कानावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच ‘परत पैसे मागितले तर सोडणार नाही’ अशी जिवे मारण्याची धमकी देऊन तो घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.