आटपाडी : सोन्याच्या वसुलीच्या संशयावरून आटपाडी तालुक्यातील घरनिकी आणि खानापूर तालुक्यातील जाधववाडी येथे एका तरुणावर दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तीन मुख्य संशयित आणि अन्य चार ते पाच अनोळखींविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदिनाथ दिलीप भोसले (वय 28, रा. जाधववाडी, ता. खानापूर) हे 3 एप्रिल रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घरनिकी येथे ओम गायकवाड याला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी संशयितांनी त्यांना ‘तू येथे 200 ग्रॅम सोने वसुलीसाठी आला आहेस का?’ असे विचारत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन साहिल चव्हाण याने काठीने भोसले यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. तसेच हर्षवर्धन माने, प्रथमेश शिंदे व इतर अनोळखींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर काही संशयितांनी भोसले यांना जबरदस्तीने गाडीत बसवून जाधववाडी येथील त्यांच्या घरी नेऊन सोडले. यानंतर 4 एप्रिल रोजी पहाटे 1 च्या सुमारास संशयितांनी पुन्हा एकत्र येत भोसले यांच्या घरात घुसून दुसरा हल्ला चढवला.
यावेळी साहिल चव्हाण याने लोखंडी गजाने भोसले यांच्या पायावर मारहाण केली, तर हर्षवर्धन माने याने काठीने हात व डोक्यावर प्रहार केले. प्रथमेश शिंदे याने केबल वायरने गळ्यावर व पाठीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले.