आटपाडी : माडगुळे (ता. आटपाडी) येथील खंडोबा मळ्यात सागाच्या झाडाच्या कारणावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय युवकास ट्रॅक्टरची लोखंडी पिन डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन अरविंद धायगुडे (वय १८, रा. माडगुळे, खंडोबामळा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजित चरण विभुते, चरण शंकर विभुते आणि अनिकेत बाळासाहेब विभुते (सर्व रा. माडगुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयितांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलात अडकलेली दुधाची गाडी बाहेर काढली. त्यानंतर त्यांनी आपला ट्रॅक्टर फिर्यादीच्या शेतातील सागाच्या झाडाकडे नेला. यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चंदन यांनी जाब विचारला, त्याचा राग मनात धरून विभुते याने चंदन यांच्या डोक्यात मारले. या हल्ल्यात चंदन गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर तिघांनीही त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आटपाडी पोलिस पुढील तपास करत आहेत.