आर्थिक वादातून तरुणाचा खून 
सांगली

Sangli Crime : आर्थिक वादातून तरुणाचा खून

अलकुड एसजवळ घटना : मृत कोकळेचा; शेअर मार्केटच्या पैशांवरून दोघांनी काढला काटा

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) हद्दीत २१ वर्षीय प्रणव प्रकाश कदम (रा. कोकळे) या तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवार, दि. १९ रोजी पहाटे उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोघा संशयितांना रात्री उशिरा अटक केली.अजय पांडुरंग चौगुले (वय २२) आणि संदीप दत्तात्रय कांबळे (वय २२, दोघेही रा. अलकुड एस.) अशी संशयितांची नावे आहेत.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांचा चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन प्रणवने दिले होते. मात्र, ना अपेक्षित परतावा मिळाला, ना गुंतवलेले पैसे परत आले. याच आर्थिक वादातून संतप्त झालेल्या दोघांनी प्रणवचा काटा काढल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली.

अलकुड (एस) हद्दीत अलकुड ते इरळी जाणाऱ्या रस्त्यापासून पश्चिमेला काही अंतरावर हा प्रकार घडला. १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्यापूर्वी प्रणववर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, कपाळावर, पाठीवर, मानेवर आणि हातावर सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रणवचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा माग काढत अजय चौगुले आणि संदीप कांबळे यांना ताब्यात घेतले. चौकशीत शेअर मार्केटमधील पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाची माहिती समोर आली.

याप्रकरणी प्रणव कदम यांचे मामा दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून प्रणवचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत अवघ्या काही तासांत संशयितांना अटक केली. या खुनामागे नेमका आर्थिक व्यवहार किती रुपयांचा होता, हत्येचे नियोजन कसे केले व गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोकळे तसेच अलकुड परिसरात खळबळ उडाली आहे.

ना परतावा.. ना पैसे...

प्रणवने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत संशयितांकडून लाखो रुपये घेतले होते. मात्र, गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्याने तसेच दिलेले पैसेही परत न मिळाल्याने दोघे संतप्त झाले होते. याच रागातून प्रणवचा खून केल्याची कबुली दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT