आष्टा : वाळवा येथे एकाने सरपंच संदेश सोपान कांबळे (वय ४०, रा. कोटभाग फुलेनगर, वाळवा) यांच्या घरात घुसून त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखत ट्रिगर दाबला, मात्र रिव्हॉल्व्हरमध्ये गोळीच नसल्याने अनर्थ टळला. या घटनेची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशयिताने घरात शिरून कांबळे यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून ट्रिगर दाबला होता. विद्याजितराजे ऊर्फ संदीप दीपक धनवडे (रा. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. सरपंच कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
सरपंच कांबळे हे २६ जूनरोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गावातील जयंतीची मिरवणूक संपवून घरी गेले. शाहू महाराज जयंतीनिमित्त संशयित धनवडे याने मिरवणूक काढली होती. मिरवणूक संपताना त्याने माईकवरून कांबळे यांचे नाव घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. वाद वाढू नये म्हणून कांबळे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते घरी निघून गेले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास धनवडे दारूच्या नशेत कांबळे यांच्या घरासमोरील व्हरांड्यात आला. ‘घराबाहेर ये, तुला मी जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत त्याने शिवीगाळ सुरू केली. सरपंच कांबळे बाहेर येताच त्याने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले आणि ट्रिगर दाबला. ट्रिगर दाबल्याचा आवाज आला, परंतु रिव्हॉल्व्हरमध्ये गोळीच नसल्याने ती झाडली गेली नाही. पोलिसांनी धनवडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.