Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime: तासगावात दोन गटात तुंबळ हाणामारी

दुचाकी अपघाताच्या भरपाईवरून वाद; पोलिसांचा लाठीचार्ज; तिघे गंभीर, १० जणांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव येथील एस.टी. कार्यशाळेजवळ दोन दुचाकी वाहनांच्या अपघातातील नुकसानभरपाई देण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या वादात लाकडी दांडके, लोखंडी गज आणि झाडांच्या फांद्यांचा वापर करण्यात आल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. तासगाव-सांगली मुख्य रस्त्यावर घडलेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या हाणामारीत सुशांत शिवाजी पाटील, त्याचा भाऊ लखन पाटील व वडील शिवाजी पाटील (तिघे रा. वरची गल्ली, तासगाव) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका गटातील अनिल पवार, पिल्या अनिल पवार, आकाश पवार, एजाज मकानदार, एजाजचा भाऊ (नाव माहीत नाही), अशोक लालासुरे व पार्थ लालासुरे (सर्व रा. तासगाव) यांच्यावर तर दुसऱ्या गटातील शिवाजी पाटील, सुशांत पाटील व लखन पाटील (सर्व रा. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी सुशांत पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एस. टी. कार्यशाळेसमोर दुचाकींचा अपघात झाला होता. या अपघातातील नुकसानभरपाई मिळण्यावरून संतोष आणि संशयित अनिल पवार यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी संशयित अनिल पवार याने सुशांत याला धरून ठेवले, तर पिल्या पवार याने हातातील लोखंडी गज संतोषच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी संतोषचा भाऊ लखन व वडील शिवाजी गेले असता, संशयित सात जणांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या गटाकडून अशोक अप्पय्या लालासुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलाचा अपघात झाल्याचा फोन आल्याने ते एस. टी. कार्यशाळेजवळ गेले होते. तेथे त्यांचा मुलगा पार्थ आणि संशयित शिवाजी पाटील यांच्यात वाद सुरू होता. अशोक हे त्यांना समजावून सांगत असतानाच, संशयित सुशांत पाटील याने तेथे उपस्थित असलेले अनिल पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

अशोक यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, सुशांतने नारळाच्या झाडाच्या फांदीने अशोक यांच्या डाव्या हातावर मारहाण केली. तसेच संशयित लखन पाटील याने जवळ पडलेले लाकडी दांडके घेऊन अशोक यांच्या पाठीत, छातीवर आणि दोन्ही पायांवर मारून त्यांना जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद तासगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT