सांगली : जुनी धामणी (ता. मिरज) येथील स्मशानभूमीचा घाट बांधण्यासाठी आलेल्या दोन बिहारी काका-पुतण्यात झालेल्या वादात काकाने पुतण्याचा गळा चिरून खून केला. मंगळवार, दि. 31 रोजी रात्री अकराच्या सुमारास धामणीत नदीकाठावर ही घटना घडली. यात विनायककुमार बालेश्वर चौधरी (22, मूळ रा. जखरा, वॉर्ड क्र. 2, चंपारण, बिहार, सध्या रा. जुनी धामणी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा काका सोनू कुमार नाथूसहानी (21, रा. तेलुहा, वॉर्ड 02, पश्चिम चंपारण, बिहार) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक आणि संशयित सोनू काका-पुतण्या आहेत. दोघेही बिहारमधून कामासाठी महाराष्ट्रात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आलास (ता. शिरोळ) येथे स्मशानभूमीच्या घाटाच्या कामावर ते मजुरी करीत होते. काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना किरकोळ कारणातून दोघांचा वाद झाला. यावेळी विनायकने काका सोनू याला मारहाण केली. तेव्हा सोनूने त्याला धमकावले होते. इतर मजुरांनी मध्यस्थी करत त्यांच्यातील वादावर पडदा टाकला होता. परंतु सोनूच्या मनात हा राग धुमसत होता. विनायकने सोनूचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचे व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखी भर पडली. या कारणावरून त्यांच्यात धुसफूस सुरू होती.
आलास येथील कामानंतर जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळील घाटाचे काम आल्यानंतर मुकादम नागेंद्र चौधरी याने सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणले. घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहात होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते. तेव्हा विनायक आणि सोनू दोघे घाटाकडे गेले. दोघांमध्ये वाद झाला. सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
विनायकचा खून केल्यानंतर सोनूने आपला सहकारी मजूर मिथुन कुमार याला बोलवून रात्री साडेदहाच्या सुमारास घाटाकडे नेले. तेथे गेल्यानंतर विनायकचा मृतदेह नदीत फेकून देण्यासाठी मदत मागितली. मात्र मिथुनने त्याला नकार दिला. त्याने परत येऊन घडलेला प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला. नागेंद्रने कंत्राटदार सुशांत सुभाष बुरंगे (रा. बोरगाव, ता. वाळवा) यांना घटनेची महिती दिली. बुरंगे रात्री साडेअकरा वाजता जुनी धामणी येथे आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
दोन दिवसात चार खून..
सांगली जिल्ह्यात दोन दिवसात चार खून झाले. सांगली शहरातील मंगळवार बाजार येथे नशेखोरीतून तरुणाचा खून करण्यात आला. बिळूर येथे जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांनी तिसऱ्या भावाचा खून केला. आणखी एका घटनेत जत तालुक्यातील अमृतवाडी येथे प्रेमसंबंधातून वांगी (ता. कडेगाव) येथील महिलेचा खून करण्यात आला. यानंतर मंगळवारी रात्री जुनी धामणी येथे काकानेच पुतण्याचा खून केल्याचे समोर आले.