सांगली ः गावभागातील मुख्य रस्त्यावर कुकरीने दहशत माजवत खुनीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भांडण सोडवण्यासाठी गेलेला तरुणही जखमी झाला आहे. होमेंद्र राजेंद्र भोसेकर (वय 24, मीरा हौसिंग सोसायटी), रशीद राजासाब मुल्ला (वय 23, रा. राणाप्रताप चौक, सांगली) दोघे गंभीर झाले. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
होमेंद्र भोसेकर हा मीरा हौसिंग सोसायटीत राहतो. तो एका मोबाईल कंपनीत कामास आहे. त्याच ठिकाणी कामास असणाऱ्याबरोबर त्याचा यापूर्वी वाद झाला होता. हा वाद पोलिसांतही गेला होता. त्यानंतर शुक्रवारी काम संपल्यानंतर भोसेकर हा गावभागातून निघाला होता. मारुती चौकाच्या अलीकडे तो थांबला. त्याठिकाणी काहीजण आले. त्यांच्यात वाद झाला. यावेळी कुकरी काढून दहशत माजवण्यात आली. हा वाद मिटवण्यासाठी तेथे असलेला रशीद मध्ये पडला. त्यावेळी हल्लेखोरांनी रशीद याच्यावरही हल्ला केला. त्याच्या डोक्यात सहा वार झाले, तसेच भोसेकर याच्यावरही वर्मी वार झाले. त्याला डोक्यात, हातावर, मानेवर वार झाले.
रात्री साडेआठच्या सुमारास परिसरात पादचाऱ्यांसह मोठी गर्दी होती. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेला पाचारण केले. जखमीस तातडीने शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.