आटपाडी : आटपाडी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदार शीतल बंडगर यांनी रविवारी पहाटे वाळू माफियांचा तब्बल दीड तास थरारक पाठलाग करत कारवाई केली. या धाडसी मोहिमेमुळे अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तहसीलदार शीतल बंडगर महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील माणगंगा नदीपात्रात गस्त घालत होत्या. यावेळी नदीपात्रात अवैध वाळू उपशासाठी आलेले एक पिकअप् आणि निळ्या रंगाचे हायवा वाहन पथकाच्या नजरेस पडले.
कारवाईची चाहूल लागताच वाहनचालकांनी वाहनांसह पळ काढला. मात्र, तहसीलदार बंडगर यांनी महसूल पथकासह या वाहनांचा पाठलाग सुरू केला. आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडीपासून सांगोला तालुक्यातील महूदपर्यंत जवळपास दीड तास हा थरारक पाठलाग सुरू होता. यादरम्यान वाळू माफियांनी प्रशासनाला रोखण्यासाठी रस्त्यात इतर वाहने उभी करून अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.
तहसीलदार बंडगर यांनी प्रसंगावधान राखत तातडीने सांगोला तहसील कार्यालय तसेच सांगोला पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून अतिरिक्त कुमक मागवली. प्राथमिक चौकशीत या वाहनांचा संबंध महूद येथील तानाजी सुनील लवटे यांच्याशी असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली आहे. महसूल पथकाने घटनास्थळी पंचनामा करून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला असून, पुढील कारवाईसाठी तो सांगोला तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार आहे.