सांगली : विश्रामबाग परिसरात विनापरवाना व अवैधरित्या सुरू असणाऱ्या कॅफेवर विश्रामबाग पोलिसांची कारवाई सुरूच आहे. या परिसरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असणाऱ्या आणखी एका कॅफेवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी कॅफे चालक संदीप साऊबा मोरे (वय २७, रा. निलजी-बामणी, ता. मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली शहर आणि विश्रामबाग परिसरातील काही कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांकडून अशा कॅफेवर सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. विश्रामबाग परिसरातील कॅफेंना महापालिकेची रीतसर परवानगी आहे का आणि महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन या कॅफे चालकांकडून केले जाते का, याची चाचपणी आता पोलिसांनी सुरू केली आहे.
या मोहिमेत विश्रामबाग येथील 'सन ७' या कॅफेची तपासणी करण्यात आली. यावेळी या कॅफेमध्ये जोडप्यांना बसण्यासाठी बेकायदेशीरपणे वेगळी व बंदिस्त खोली तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या कॅफेवर तातडीने कारवाई करत विश्रामबाग पोलिस ठाण्यात याची नोंद केली आहे.
त्या पोलिस कर्मचाऱ्याची उचलबांगडी कधी?
विश्रामबाग परिसरातील अवैध कॅफेंवर कारवाई करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने मोहीम सुरू केली आहे. मात्र, ही कारवाई सुरू होताच विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने आधीच सर्व कॅफेचालकांना कॅफे बंद करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे नितीन चौगुले यांनी केला होता. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. मात्र, या तक्रारीला काही दिवस उलटूनही त्या कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे.