सांगली : पोलिस रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार छोट्या ऊर्फ विक्रांत शंकर बाबर (रा. सुतार प्लॉट, बसस्थानकमागे, सांगली) याने आठ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेस अश्लील शिविगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. तिसऱ्या घटनेत एका युवकास कोयत्याच्या धाकाने धमकावून अंगावर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकारही घडला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका परिसरात दोन ते तीन दिवसांपूर्वी उष्मा असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून महिला आपल्या लहान मुलीसोबत घरात बसली होती. त्यावेळी तिची मोठी पंधरावर्षीय मुलगी कॉटवर झोपलेली होती. यावेळी घरासमोरून जाणाऱ्या संशयित छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर याने एकटक कॉटवर झोपलेल्या मुलीकडे पाहिले. मुलीच्या आईने रागाने घराचा दरवाजा बंद करून घेतला. याचा राग आल्याने छोट्या बाबर याने त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून बाबर याने गोंधळ घातला. या गोंधळामुळे पीडित महिलेची लहान मुलगी जोराने रडायला लागली. त्यावेळी महिलेने आपल्या मुलीस, का रडतेस, अशी विचारणा केली. तेव्हा तिने तिच्याबाबतीत बाबर याने केलेले कृत्य सविस्तरपणे सांगितले. पीडित आठ वर्षांची मुलगी इतर मुलींबरोबर खेळत असताना छोट्याने तिला ओढून आपल्या घराकडे नेले होते. तेथे धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यादिवशी घडलेल्या त्या प्रकारामुळे पीडित मुलगी अद्यापही घाबरलेली दिसत होती, असे पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.
मुलीच्याबाबतीत संशयिताने केलेले कृत्य समोर येताच संबंधित महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्वरित त्यांची फिर्याद घेऊन छोट्या बाबर याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे.
दुसऱ्या घटनेत परिसरातील एक महिला दूध आणण्यासाठी निघाली होती. ती महिला बाबरच्या घरासमोरून जात असताना छोट्या बाबरने जुन्या वादाचा राग मनात धरून संबंधित महिलेला अश्लील शिविगाळ करायला सुरुवात केली. तुझी गाडी फोडून टाकीन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुला भीक मागायला लावीन, असे म्हणत पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पीडितेला, तिच्या भावाला, आईला आणि आजीला मारून टाकतो, म्हणून धमकी दिल्याची फिर्याद आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार देताच शहर पोलिसांनी बाबरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाला मारहाण करून अंगावर लघुशंका
छोट्या बाबर याने तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावर लघुशंका करून जातिवाचक शिविगाळ केली. त्याच्या मोपेडवर हत्याराने मारून तोडफोड करीत नुकसान केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. तरुणाच्या वडिलांनी याबाबत छोट्या बाबरविरुद्ध ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे.