सांगली : शहरातील हनुमाननगर भागात वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिताना झालेल्या जुन्या वादातून मित्रावर होणारा कोयत्याचा वार चुकवताना मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या मानेवर वार होऊन तो गंभीर जखमी झाला. अक्षय जयवंत निकम (वय २७, रा. डी-मार्टच्या मागे, मुसळे प्लॉट, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी संशयित दीपक गंगाप्पा ऐवळे (वय २३, रा. गुलाब कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचा मित्र रितेश सकटे याचा गुरुवारी वाढदिवस होता. यामुळे सर्वजण हनुमाननगर येथे एकत्र येऊन दारू पीत बसले होते. यावेळी रितेश सकटे आणि संशयित दीपक ऐवळे यांच्यात जुन्या कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात दीपकने जवळ असलेला कोयता काढून रितेशवर वार करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असलेल्या अक्षय निकम याने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, कोयत्याचा खोल वार अक्षयच्या मानेच्या डाव्या बाजूला लागला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले.