Vedant bandgar murder case 
सांगली

Vedant Bandgar murder case : संशयित नदाफ निष्पाप

वेदांतच्या पित्याचा दावा; पोलिसांना दिला अर्ज

पुढारी वृत्तसेवा

सांगली : अभयनगर येथील १४ वर्षीय बालक वेदांत मारुती बंडगर याच्या खुनाच्या गुन्ह्याला आता एक नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला मोहम्मद जमाल नदाफ हा पूर्णपणे निष्पाप असून, त्याचा या खुनात कोणताही सहभाग नाही, असा दावा खुद्द मृत वेदांतचे वडील मारुती बाळू बंडगर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी अर्ज सादर केला आहे.

गेल्या महिन्यात, ११ जून रोजी वेदांत बंडगर याचा नीलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी खून केला होता. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आतापर्यंत मुख्य संशयितांसह इतर संशयितांना जेरबंद केले आहे. तथापि, पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेला संशयित मोहम्मद जमाल नदाफ याच्या सहभागाबाबत मृत वेदांतच्या वडिलांनी आक्षेप घेतला आहे.

पोलिसांना दिलेल्या अर्जात मारुती बंडगर यांनी म्हटले आहे की, मोहम्मद नदाफ हा आमच्या शेजारी अनेक वर्षांपासून राहत आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमचे त्याच्याशी कोणतेही जुने वैर किंवा भांडण नाही. माझ्या मुलाच्या खुनाच्या घटनेत त्याचा कोणताही संबंध नाही, हे मी खात्रीलायकपणे सांगू शकतो.

मोहम्मद नदाफ हा या घटनेत निर्दोष असल्याचे सांगत, पीडित पित्याने पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, या अर्जाचा आणि आपल्या विधानाचा गांभीर्याने विचार करून त्याची नोंद पोलिस केस डायरीमध्ये घेतली जावी. आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदारानेच एका संशयितास क्लीनचीट दिल्यासारखा अर्ज केल्यामुळे पोलिस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि तपासाची चक्रे कोणती दिशा घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT