सांगली : वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीलेश गडदे याला पिस्तूल पुरवणाऱ्या मलीक सलीम शेख (रा. मिरज) याचा पोलिसांनी कारागृहातून ताबा घेतला आहे. पिस्तूल कोठून आणले आणि ते गडदेला किती रुपयांना विकले, याचा तपास पोलिस करत आहेत.
गडदे याच्यासह कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ, किरण लोखंडे, संदेश घागरे आणि अतुल वायदंडे यांना यापूर्वीच अटक केली आहे. सध्या शेख पोलिसांच्या कोठडीत असून, सागर चौगुले हा नजरकैदेत आहे. या गुन्ह्यातील आणखी एक संशयित विशाल चौगुले फरार आहे.
मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामाच्या कारणावरून खरात आणि गडदे गटात जुना वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे असल्याने त्यांनी ते सोडावे, यासाठी संशयित नीलेश गडदे त्यांच्यावर सतत दबाव आणत होता. १० जून रोजी रात्री सातच्या सुमारास गडदे याने दोन साथीदारांसह खरात यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणी मागितली होती. या घटनेची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल एकत्र आल्याने दोन्ही गट समोरासमोर आले व तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. त्या वेळी संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक केली. याच रागातून नीलेश गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. या वेळी घराच्या अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्यावर संशयितांनी गोळी झाडली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पावले उचलत गडदेसह त्याच्या प्रमुख साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील संशयितांवर लवकरच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.