Sangli Crime 
सांगली

Sangli Crime : वारकऱ्यांच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास : मालगावजवळ लूटमार

पुढारी वृत्तसेवा

मिरज : गोव्यातून पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या साहित्यावर चोरट्याने डल्ला मारून १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मिरज तालुक्यातील मालगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रकांत रघुवीर गवंडी (रा. बार्देश, गोवा) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गोव्यातील पिर्ण येथील श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम वारकरी मंडळाचे वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाले होते. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना, त्यांनी रात्री मालगावच्या हद्दीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये मुक्काम केला. मात्र, रात्रीच्यावेळी शेडचे गेट बंद करायचे राहून गेले. याचाच फायदा उठवत चोरट्याने मध्यरात्री शेडमध्ये प्रवेश करून वारकऱ्यांचे आठ मोबाईल आणि रोख रक्कम चोरून पलायन केले.

या चोरीमध्ये तृप्ती तुलसीदास माऊलीकर, अंजली अनिल साळगावकर, शलाका वेर्णेकर, योगिता सावळे, रीमा पेडणेकर, प्रदीप फडके, सर्वेश कळंगुटकर, सागर हळणकर आणि महादेव कांदोलकर या नऊ वारकऱ्यांचे मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेली आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल झाली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT