kidnapping case Pudhari File Photo
सांगली

Sangli Crime : पैशाच्या वादातून मुकादमाचे अपहरण

भैरवनाथ शुगर्सच्या तीन अधिकाऱ्यांसह आठजणांवर जत पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

जत : कारखान्याच्या पैशाच्या वादातून एका मुकादमाला भररस्त्यात अडवून मारहाण करत काळ्या रंगाच्या वाहनातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार जत शहरालगतच्या वळसंग रस्त्यावर घडला. मल्हारी ऊर्फ मल्लप्पा रावसाहेब तांबे (रा. पांढरेवाडी, ता. जत) असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगर्सच्या तीन अधिकाऱ्यांसह अन्य पाच जणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वंदना मल्हारी तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढरेवाडी येथील मुकादम मल्हारी तांबे हे २९ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ रावण सोमा कोकरे यांच्यासोबत दुचाकीवरून जत येथून घरी जात होते. या वेळी जत येथील पाण्याच्या टाकी परिसरात काळ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या काही जणांनी त्यांना अडविले. फिर्यादीनुसार, भैरवनाथ शुगर्सचे गट अधिकारी संभाजी गिड्डे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, शेती अधिकारी लोंढे तसेच त्यांच्यासोबतच्या अन्य पाच जणांनी तांबे व कोकरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ‘कारखान्याचे पैसे भरत नाहीस का, आता तुझा जीवच घेतो’, अशी धमकी देत त्यांनी मल्हारी तांबे यांना जबरदस्तीने वाहनात घालून पळवून नेले. या गोंधळादरम्यान संशयितांनी रावण कोकरे यांचा मोबाईल फोनही काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

भरदिवसा घडलेल्या या नाट्यमय अपहरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे मुकादम व ऊसतोड कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोटे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT