सांगली : सांगली शहरातील वर्दळीच्या राम मंदिर चौकात शुक्रवारी मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. सराईत गुन्हेगार प्रफुल्ल अरुण पोतदार ऊर्फ टोल्या याने केलेल्या गोळीबारात नीलेश प्रमोद जाधव (वय 29, रा. हिराबाग कॉर्नर, सांगली) हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रफुल्ल अरुण पोतदार (रा. सम्राट व्यायाम मंडळ), दिलावर जमादार (रा. सम्राट व्यायाम मंडळ) आणि सुधीर ऊर्फ कांच्या माळी (रा. शामरावनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांचे वय 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित टोल्या याच्या मुलाच्या वाढदिवसाला अजय माने उपस्थित नव्हता. याच कारणावरून शुक्रवारी मध्यरात्री राम मंदिर परिसरात टोल्या, दिलावर आणि सुधीर यांचा अजय माने व त्याचा आत्येभाऊ नीलेश जाधव यांच्याशी वाद झाला. ‘वाढदिवसाला का आला नाहीस?’ असे म्हणत टोल्याने अजयला शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित दिलावरने पिस्तूल काढून हवेत एक राऊंड फायर केला, तर सुधीर हातात कोयता घेऊन धावून आला. यावेळी टोल्याने अजयच्या दिशेने पिस्तूल रोखली असता, त्याला वाचवण्यासाठी नीलेश मध्ये पडला. या झटापटीत टोल्याने केलेल्या गोळीबारात नीलेशच्या गुडघ्याखाली गोळी लागली. नीलेश रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी नीलेशवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे आणि शहर पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
आर्थिक वादाचे कारण?
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, हा प्रकार आर्थिक वादातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
टोल्या सराईत गुन्हेगार
टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत त्याच्या कारवाया थंडावल्या होत्या, मात्र शुक्रवारी रात्री केलेल्या गोळीबाराने तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.
भीतीचे वातावरण, सुरक्षेचा प्रश्न
शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबाराचा प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे सांगली शहर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माने पुन्हा चर्चेत...
ज्या अजय मानेवर संशयित टोल्या पोतदार याने पिस्तूल रोखले होते, तो देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे, दीड वर्षापूर्वी गुंड म्हमद्या नदाफने अजय माने याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून सलीम मुजावर याच्यावर गोळीबार केला होता. आता पुन्हा एकदा अजय माने गोळीबार प्रकरणातील चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.