विवाहितेचा छळ File Photo
सांगली

Sangli Crime : बहादूरवाडीत १० लाखांसाठी विवाहितेचा छळ

पतीसह सासरच्या पाचजणांवर आष्टा पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : माहेरहून आणखी १० लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी बहादूरवाडी (ता. वाळवा) येथील एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, दीर आणि जाऊ अशा पाचजणांविरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती विशाल भीमराव घोरपडे (वय ३६), सासू सौ. छाया भीमराव घोरपडे (वय ५८), सासरा भीमराव गोविंद घोरपडे (वय ६५), दीर प्रशांत भीमराव घोरपडे (वय ४०) आणि जाऊ जया प्रशांत घोरपडे (वय ३५, सर्व रा. बहादूरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्राजक्ता विशाल घोरपडे (वय ३१, सध्या रा. फाळकेवाडी, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१९ पासून ते आजतागायत विवाहितेचा छळ सुरू होता. प्राजक्ता घोरपडे यांचा विवाह बहादूरवाडी येथील विशाल घोरपडे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सर्व संशयितांनी आपापसात संगनमत करून प्राजक्ता यांच्याकडे पैशांची मागणी लावून धरली होती. सासरचे कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता यांच्या माहेरच्यांनी यापूर्वी ८ लाख ३९ हजार रुपये दिले होते. तरीही पती व सासरच्या लोकांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा त्याच कामासाठी माहेरहून आणखी १० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. प्राजक्ता यांनी पैसे आणण्यास नकार दिला असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात आली. तसेच अनेकदा उपाशी ठेवून त्यांचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.

सासरच्या या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने सध्या आपल्या नातेवाईकांकडे (फाळकेवाडी) आश्रय घेतला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT