सांगली : सोबत दारू पिण्यास आले नाही म्हणून रागातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये मनोज मोहन शिंदे हे जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी धीरज नाईक, संतोष ऊर्फ बंड्या नाईक (दोघे रा. कवलापूर), स्वप्निल पाटील (रा. बुधगाव) आणि आरबाज (रा. कुमठे, ता. मिरज) यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनोज शिंदे हे त्यांच्या मित्रासमवेत कवलापूर येथे दारू दुकानात दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी धीरज नाईक आणि संतोष नाईक हे दोघे आले. त्यांनी मनोज शिंदे यांना, आमच्यासोबत दारू प्यायला का आला नाहीस, असे म्हणून त्यांच्या मोबाईलची व दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांना कवलापूर विमातळावर नेण्यात आले. त्या ठिकाणी उर्वरित दोघे स्वप्निल पाटील व आरबाज या दोघांना बोलाविण्यात आले. चौघांनी मनोज यांना 'तुला आमच्यासोबत दारू प्यायला यायला नको वाटतंय का?, तुला आमची भीती राहिली नाही का? असे म्हणून काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.