दागिने चोरणारी कोल्हापूरची महिला सांगली पोलिसांच्या जाळ्यात  File Photo
सांगली

Sangli Crime : दागिने चोरणारी कोल्हापूरची महिला सांगली पोलिसांच्या जाळ्यात

विट्यातील चोरीचा छडा : ६.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या कोल्हापूरमधील एका सराईत चोरट्या महिलेस सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) आष्टा बसस्थानक परिसरातून शिताफीने अटक केली. कविता सतीश काळे (वय ४६, रा. कनान नगर झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याकडून विटा बसस्थानकावरून चोरलेले ६ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आष्टा बसस्थानक परिसरात एक संशयित महिला फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे असलेल्या पर्समध्ये ६ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, बांगड्या आणि ५०० रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ६ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

याबाबत तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने दोन महिन्यांपूर्वी विटा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना शीतल रवींद्रकुमार जाधव (रा. हातनूर, ता. तासगाव) यांच्या पर्समधून हे दागिने चोरल्याची कबुली दिली. या चोरीबाबत विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. एलसीबीने अटक केलेल्या महिलेस जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपासासाठी विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT